Buldhana News : ...तर शेतकरी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही, प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकाचं नुकसान झालेल्या हतबल शेतकऱ्याची फेसबुक पोस्ट
Buldhana News : चिखली, मेहकर परिसरात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गजानन गिऱ्हे नावाच्या शेतकऱ्याने रोह्यांमुळे पिकांचं होत असलेलं नुकसान दाखवत आपली हतबलता फेसबुकद्वारे व्यक्त केली आहे.
Buldhana News : सध्या रब्बी हंगाम (Rabi Season) बहरला असून माळरानात गहू, हरभरा, कांदा पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या वातावरणही पोषक असल्याने पिके चांगल्या परिस्थितीत आहेत. मात्र बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली, मेहकर परिसरात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. देऊळगाव माळी येथील गजानन गिऱ्हे नावाच्या शेतकऱ्याने रोह्यांमुळे पिकांचं होत असलेलं नुकसान दाखवत आपली हतबलता फेसबुकद्वारे व्यक्त केली आहे. तसंच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
'शेतकऱ्यांना नुसत्याच बळीराजा, जगाचा पोशिंदा बिरुदावली लावू नये'
सरकारी धोरणांमुळे शेतीमालाला भाव नाही, सोयाबीन, तूर, कापसावर बंद, आयात शुल्क माफी मग नैसर्गिक संकट आणि आता वन्यजीवांच्या संकटामुळे पिकांचं नुकसान होत असेल तर भविष्यात शेतकरी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही, अशी उद्विग्नता शेतकऱ्याने बोलून दाखवली. तसंच शेती हा व्यवसाय आहे आणि सरकार व्यावसायिकांना जशा सुविधा देतो त्यापेक्षा जास्त सुविधा शेतकऱ्यांना द्याव्या. नुसताच बळीराजा, जगाचा पोशिंदा अशा मोठमोठ्या बिरुदावली लावून त्याला मिरवू नये," असं या शेतकऱ्याने म्हटलं आहे.
शेतकऱ्याची फेसबुक पोस्ट
"खरंच शेतकरी किती हतबल आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आज शेतात गेलो असता पाच एकर शेतामधून 50 रोह्यांचा कळप एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर गेला. भरपूर नुकसान झाले, एका बाजूला शेतीमालाला भाव नाही दररोज सोयाबीन, कापूस, तूर यांचे भाव सरकारी धोरणामुळे कमी जास्त होत आहे. व्यापाऱ्यांसाठी, मिल मालकांसाठी, पोल्ट्रीवाल्यांसाठी सरकार शेतकऱ्यांच्या हाती आलेला मालाची किंमत कमी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. वीस लाख टन तुरीची आयात, सोयाबीनची आयात, वायदे बाजारात सोयाबीन, तूर, कापूस यावर बंदी आयात शुल्क माफी असे नानाविध हत्यारे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर चालवत आहे. या सर्वांचा मारा सहन करुन शेतकरी पुढील पिकाची तयारी करत असतो. त्याला याची किती किंमत मिळणार याची शाश्वती नसते तरी बिचारा राब राब राब राबतो आणि नैसर्गिक संकटानंतर असे वन्यजीवांचे संकट जर शेतकऱ्यावर येत असेल आणि त्याच्या हाती येणाऱ्या पिकांचे नुकसान होत असेल तर भविष्यात शेतकरी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. शेती हा व्यवसाय आहे आणि सरकार व्यावसायिकांना जश्या सुविधा देते त्यापेक्षा जास्त सुविधा शेतकऱ्यांना द्याव्या नुसताच बळीराजा, जगाचा पोशिंदा, अशा मोठमोठ्या बिरुदावली लावून त्याला मिरवू नये...."