मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्या निवडून येण्याने धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याला पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
Tanaji Sawant : परांडा विधानसभा मतदारसंघात (Paranda assembly) अत्यंत चुरशीची लढत झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत (Tanaji Sawant) सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राहुल मोटे (Rahul Mote) यांचा पराभव केला आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या निवडून येण्याने धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याला पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्या प्रचारसभेत बोलताना तुम्ही तानाजीरावांना आमदार करा, मी नामदार करतो हा शब्द दिला होता. त्यामुळं तानाजी सावंतांच्या गळ्यात मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
तानाजी सावंत यांचा 1500 मतांनी विजय
धाराशिव, लातूर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकमेव आमदार आला निवडून आहे. ते म्हणजे तानाजी सावंत. परांडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांचा 1500 मतांनी विजय झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार राहुल मोटे यांच्या आक्षेपानंतर रात्री उशिरा विजय घोषित करत सावंत यांना प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आमदारांची रीघ
दरम्यान, सरकार स्थापनेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आमदारांची रीघ लागली आहे. ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्री सध्या आहेत. तिथे तानाजी सावंत यांनी देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, सर्व आमदारांना खासगी हॉटेलमध्ये थांबण्याच्या सूचना असताना देखील अनेक आमदार शुभेच्छा देण्यासाठी थेट शिंदेंच्या घरी येत आहेत. यात काही अपक्ष आमदार देखील असल्याने शिवसेनेचे संख्याबळ वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असे काही आमदारांचे मत आहे.
महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठीचा फॉर्म्युला काय?
दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु आहे. 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या 132 आमदार आहेत. त्यामुळं फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहेत. तर शिवसेनेच्या 57 जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला 10-12 मंत्रिपदं येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला 8 ते 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.