(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Success Story : लिंबाला सोन्यासारखा भाव, हिंगोलीतील शेतकऱ्याला अडीच एकरातून 13 लाखाचं उत्पादन अपेक्षित
हिंगोलीमधल्या कांडली इथले शेतकरी श्रीकांत पतंगे यांनी लिंबाच्या बागेची लागवड केली असून लखपती झाले आहेत. त्यांना अडीच एकर लिंबोणीच्या बागेतून 13 लाख रुपयांचं उत्पादन अपेक्षित आहे.
हिंगोली : उन्हाळा म्हटलं की लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु दरवर्षी लिंबाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. परंतु यावर्षी लिंबाला सर्वोच्च भाव मिळाला आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत लिंबूची 150 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्याच्या लिंबांना सोन्याचा भाव आला आहे. हिंगोलीमधल्या कांडली इथले शेतकरी श्रीकांत पतंगे यांनी लिंबाच्या बागेची लागवड केली असून लखपती झाले आहेत. त्यांना अडीच एकर लिंबोणीच्या बागेतून 13 लाख रुपयांचं उत्पादन अपेक्षित आहे.
लिंबू उत्पादक शेतकरी श्रीकांत पतंगे वडिलोपार्जित शेती असलेल्या शेतीमध्ये काहीतरी वेगळं करायचं यांनी ठरवलं. परंतु शेतीची गुणवत्ता चांगली नसल्याने करायचं काय हा मोठा प्रश्न होता कृषी विभागाच्या सल्ल्याने काटेरी झाडे असतील अशा पिकांची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळेल अशी त्यांना माहिती मिळाली. त्यावर त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतामध्ये लिंबाच्या झाडांची अर्थात लिंबोणीच्या बागेची लागवड केली. अडीच एकर शेतीमध्ये 600 लिंबाच्या झाडांची लागवड पतंगे यांनी केली आहे. या बागेला आतापर्यंत जोपासताना श्रीकांत पतंगे यांना तीन लाख रुपये खर्च आला आहे. ठिबकच्या माध्यमातून पाणी देणे आणि वेळेवर खत पुरवत त्यांनी तीन वर्षात ही बाग मोठी केली आहे.
दोन-तीन वर्ष झाडांची पूर्णपणे वाढ झाल्यानंतर गेल्या वर्षीपासून पतंगे ही शेतकरी लिंबाचे उत्पादन घेऊ लागले आहेत. परंतु गेल्या वर्षी बाजार भाव नसल्याने किरकोळ दराने लिंबाची विक्री करावी लागली होती. गेल्या वर्षी 50 हजारांचे उत्पन्न या लिंबाच्या बागेतून मिळाले होते. परंतु यावर्षी संपूर्ण बाग लिंबांनी बहरुन गेली आहे. या लिंबोणीच्या बागेत लिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये निघणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात विशेष म्हणजे यावर्षी बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लिंबाला मागणी आहे. 150 रुपये प्रति किलोप्रमाणे लिंबाला मागणी असल्याने या लिंबाला आता सोन्यासारखा भावा आला आहे.
पतंगे यांच्या शेतातील अडीच एकरावरील या लिंबाच्या बागेतून अंदाजित 90 क्विंटल उत्पादन निघणार आहे. त्यानुसार या बागेतून साधारणतः 13 लाख रुपये इतका मोबदला या शेतकऱ्याला मिळण्याची अपेक्षा आहे
यावर्षी मराठवाड्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. परिणामी लिंबाचे बाजार भाव हे आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यामुळे याचा थेट फायदा पतंगे यांना होणार आहे.
Hingoli : लिंबाची 150 रुपये किलोने विक्री, लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे 'अच्छे दिन'