Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे : जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे (Donje) गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर (Vitthal Polekar) यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हेवाडी, खडकवासला येथे भरदिवसा एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. सतीश थोपटे (Satish Thopte) (रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे मृताचे नाव आहे. हल्लेखोर पसार झाले असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथील सतीश थोपटे राहत असलेल्या वसाहतीच्या परिसरात अज्ञात चार हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन पाठलाग करत त्यांच्यावर सपासप वार केले. यानंतर गंभीर जखमी झालेल्या सतीश थोपटे यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोल्हेवाडी या गजबजलेल्या परिसरात भर दिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला कोणी व का केला? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून हल्ल्याची संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस नेमक्या काय उपाययोजना राबवणार? याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या