Rayat Kranti Sanghatana : अवकाळीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, एकरी 1 लाख रुपयाचं अनुदान द्या, रयत क्रांती संघटनेचं उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी रयत क्रांती संघटनेनं केली आहे.
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात रयत क्रांती संघटनेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे ऊस गाळप अद्याप शिल्लक आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला गेले आहेत, त्याचे बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. तसेच वारंवार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा करावा, अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेचे समन्वयक प्रा. सुहास पाटील यांनी अजित पवार यांना दिले आहे.
नेमक्या मागण्या कोणत्या केल्या आहेत
अजित पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रा. सुहास पाटील यांच्यासह रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवदेन दिले.
1) सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखानदारांनी उसाची बिले दिले नाहीत. त्या कारखान्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा
2)अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांच नुकसान झाले आहे. त्याचे त्वरीत पंचनामे करावे. तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्वरीत एकरी एक लाक रुपयांचे अनुदान द्यावे असी मागणी देखील करण्यात आली आहे.
3) शेतकऱ्यांचा विजपुरवटा वारंवार खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 8 तास विनाकपात वीज मिळावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
4)अनेक शेतकऱ्यांना अद्यार पीक विमा मिळालेला नाही, त्या शेतकऱ्यांना त्वरीत पीक विमा मिळावा , त्याचे आदेस द्यावेत असी मागणी यावेळी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्याबाबतही अजित पवार यांना माहिती दिली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील थकीत ऊस बिल प्रकरणी ज्या कारखान्यांनी चालू हंगामातील बिले दिले नाहीत, याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी बोलतो असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याची माहिती सुहास पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: