(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MLA Babandada Shinde : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, उजनीतून पाणी न सोडल्यास दोन हजार कोटींचं नुकसान : बबनदादा शिंदे
Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी माढा (Madha)तालुक्याचे आमदार बबनदाद शिंदे (MLA Babandada Shinde) यांनी केली आहे.
Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी माढा (Madha)तालुक्याचे आमदार बबनदाद शिंदे (MLA Babandada Shinde) यांनी केली आहे. उजनी धरणातून (Ujani Dam) पाणी न सोडल्यास दोन हजार कोटींचं नुकसान होणार असल्याचे शिंदे म्हणाले. आमदार शिंदे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त आड माढ्यात नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला, त्या कार्यक्रमानंतर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी डॉ तात्याराव लहाने, डॉ रागिणी पारिख, आमदार संजयमामा शिंदे उपस्थित होते.
उजनीतून पाणी सोडल्यास तहानलेल्या पिकांना जीवदान
पावसानं दडी मारल्यानं राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळं उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे. उजनी धरणातून पिकासाठी एक पाळी पाणी दिल्यास तहानलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. तरही उजनीत 50 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्यास वर्षभराची तहान देखील भागेल आणि पिकाला जीवदान मिळेल असे आमदार शिंदे यांनी सांगितलं.
भविष्यात 'हा' निर्णय घ्यावा लागेल
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, अजून ती वेळ आली नाही. मात्र, भविष्यात हा निर्णय घ्यावा लागेल असे आमदार शिंदे म्हणाले.
उद्या कालवा सल्लागार समितीची बैठक
दरम्यान, उद्या कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. कारण उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवायची मागणी सोलापूर शहरातील आमदारांची आहे. यातच पुणे शहरातही पाणी कपातीच्या हालचाली सुरु असल्यानं पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीवर देखील वाद होण्याची शक्यता आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही बबनदादा शिंदे यांनी केली आहे. 10 सप्टेंबर रोजी सोलापुरात शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी पाणी प्रश्न सोडवण्याचा दबाव शासनावर आला आहे. दरम्यान, सध्या सोलापूर जिल्ह्यात सध्या बिकट परिस्थिती झाली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची उभी पिकं वाया जात आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: