(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cotton Price : यंदा महाराष्ट्रात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता
Cotton Price : यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Cotton Price : कापूस... (Cotton) महाराष्ट्रातल्या प्रमुख नगदी पिकांपैकी एक. मागच्या वर्षाचा हंगाम संपताना कापसाला 14 हजारांवर भाव मिळाला होता. यावर्षीही कापसाचं पीक शेतकऱ्यांसाठी (Farmer) नवा आशेचा किरण घेऊन आलं आहे. यावर्षी हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. इथे कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल. यामुळे महाराष्ट्रातही या हंगामात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे कापसाला चांगला भाव मिळ शकतो.
यंदा भारतात कापूस लागवड 6.65 टक्क्यांनी वाढली आहे. देशात नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मार्केटमध्ये येतो. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे भाव आठ टक्क्यांनी वाढले आहेत. भविष्यात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 500 गाठींपेक्षा कमी कापूस बाजारात दाखल झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या कापसाची किंमत जवळपास दुप्पट आहे. नवीन कापसाला 9 हजार 900 ते 10 हजार रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत कापसाचा सरासरी भाव 5 हजार रुपये होता. भविष्यात कापसाचा भाव 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति गाठी असेल असं तज्ज्ञांचं मत आहे.
गेल्या चार वर्षात कापसाला मिळालेला भाव
वर्ष मिळालेला भाव
2017-18 4500-5000
2018-19 4500-5000
2019-20 5600
2020-21 5800
2021-22 8000-14000
बाजारात कापसाची आवक वाढल्यानंतर भाव 35 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. मात्र त्यानंतर पुन्हा दरात सुधारेल असा अंदाज आहे. तर कापसाच्या भाववाढीचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने धोरण राबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, कापसाच्या भावावरुन यावर्षीही राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
'कापूस कोंड्याची गोष्ट' म्हणून कापसाच्या पिकाची गेल्या दोन दशकांत चांगलीच अप्रतिष्ठा झाली आहे. सरकारी धोरणं, योग्य बाजारभाव अन् बाजारातील विक्री-लिलाव पद्धतीत पारदर्शकता आणली तर हे पांढरं सोनं पुन्हा चकाकू लागेल. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं हिच अपेक्षा आहे.
Cotton at good price : नवीन कापसाची आवक, शेतकऱ्यांना मिळाला 10 हजारांचा दर