(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Arvind Kejriwal : दिल्लीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या हस्ते मदतीचे वाटप
आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. दिल्ली सचिवालयाच्या सभागृहात हे चेक शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.
नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना दिल्ली सरकारने मदत देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते नुकसान भरपाईच्या रकमेचे चेक शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. दिल्ली सचिवालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे चेक शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी पंजाब सरकारवर जोरदार टीका केली.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही नुकसानभरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केल्याचे केजरीवाल म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी दावा केला आहे की, संपूर्ण देशातील शेतकर्यांपेक्षा दिल्लीतील शेतकऱ्यांना जास्त नुकसानभरपाई देण्यात आली आहे. प्रतिएकरी 20,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहे. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, याशिवाय जानेवारीत मोहरी पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासंबधी सर्वेक्षण करण्याच आदेस दिले असल्याचे केजरीवाल म्हणाले.
पावसामुळे 70 टक्क्यांपेक्षा कमी पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या 70 टक्के मदत मिळणार आहे. तर 70 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्यास 100 टक्के नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी पंजाब सरकारवर आरोप करत पंजाबमध्येही कापूस पिकाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असून, पंजाब सरकारने 12 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. ज्या देशात किंवा राज्यामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान होत नाही, तो देश प्रगती करू शकत नाही असेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2013 चा एक किस्सा सांगितला. आमचा नवा पक्ष स्थापन झाला होता. त्यावेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री या दिवंगत शीला दिक्षीत होत्या. यावेळी काही पत्रकार त्यांच्याकडे गेले होती. त्यांनी दिक्षीत यांना गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी खूप दुःखी आहेत. काही नुकसानभरपाई मिळेल का? त्यावर त्यांचे उत्तर होते की दिल्लीतही शेती आहे का? असा किस्सा केजरीवाल यांनी यावेळी सांगितला.
महत्त्वाच्या बातम्या: