Paithan News : एकीकडे अस्मानी संकट, दुसरीकडे कर्जाचा डोंगर; शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांच्या नोटीस
Bank Notices to Farmers : एकीकडे अस्मानी संकट असतानाच आता दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
पैठण : पावसाळा (Monsoon) सुरू होऊन अडीच महिन्यांपेक्षा अधिकचा काळ संपत आला आहे, असे असताना अजूनही राज्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. एकीकडे हे संकट असतानाच आता दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांच्या नोटीसा (Bank Notice) पाठवल्या जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांच्या नोटीस
जून महिना कोरडा गेला, जुलैत थोडाफार पाऊस झाला, त्यात आता ऑगस्ट महिन्यात देखील पावसाचा खंड पडला. गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर पिकांना वाचवणं अवघड झालं आहे. त्यातच राजाने पाठ फिरवल्याने शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे, आता बळीराजावर आणखी एक सुलतानी संकट आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांकडून थेट नोटिसा पाठवल्या जात आहे. एवढेच नाही तर कर्ज न भरल्यास खटला दखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील बँकांनी दिला आहे. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज भरण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
एकीकडे अस्मानी संकट, दुसरीकडे कर्जाचा डोंगर
पैठण तालुक्यातील बालानगर गावातील रामनाथ गोर्डे यांचं घर शेतीवर चालतं. पण, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी ढोरकिन येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतीसाठी 25 हजाराचं कर्ज घेतलं. शेतीतून होणाऱ्या उत्पन्नातून हे कर्ज ते फेडणार होते. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर, कधी परतीच्या पावसाने शेती नेहमी तोट्यात राहिली. त्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पीकं उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता गोर्डे यांना बँकेने नोटीस पाठवून शेतीसाठी घेतलेलं कर्ज भरण्याचा तगादा लावला आहे. 25 हजाराचं कर्जाचे व्याजासह 41 हजार रुपये भरण्याच नोटीसेतून सांगण्यात आलं आहे. तसेच तीस दिवसात हे कर्ज न फेडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार?
ही परिस्थिती एकट्या गोर्डे यांचीच नसून, अशा अनेक शेतकऱ्यांना आता बँकांच्या नोटीस येऊ लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांना या नोटीसा आल्या आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन देत आहे. मात्र, दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांकडून नोटीसा पाठवल्या जात आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या उद्योजकांचे कर्ज माफ करून मदतीसाठी धावून येणार सरकार, आता शेतकऱ्यांच्या संकटात सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहणार का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.