Agriculture : विदर्भातील संत्र्याला बांगलादेशचा झटका, आयात शुल्क वाढवल्यानं संत्री फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
संत्री उत्पादक शेतकरी (Oranges Farmers) सध्या अडचणीत सापडला आहे. बांगलादेशने भारतीय संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवल्यानं शेतकऱ्यांवर छोट्या आकाराची संत्री फेकून देण्याची वेळ आली आहे.
Nagpur Agriculture News : नागपूर (Nagpur) आणि अमरावती (Amravati) हे दोन जिल्हे संत्र्यासाठी (Oranges) प्रसिद्ध आहेत. मात्र, येथील संत्री उत्पादक शेतकरी (Oranges Farmers) सध्या अडचणीत सापडला आहे. या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर छोट्या आकाराची संत्री फेकून देण्याची वेळ आली आहे. बांगलादेशने भारतीय संत्र्यांवरील आयात शुल्क (Import duty) वाढवले आहे. त्यामुळं बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊनही त्याचा पुरवठा कमालीचा घटला आहे. चांगल्या मात्र आकाराने छोट्या संत्र्यांना कोणीच खरेदीदार नसल्यानं शेतकऱ्यांवर ते फेकून देण्याची वेळ आली आहे.
200 ट्रकवरुन सध्या फक्त 20 ट्रक संत्र्याची बांगलादेशात निर्यात
संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी सध्या छोट्या आकाराची संत्री फेकून देत आहेत. बांगलादेशने भारतातून त्यांच्या देशात आयात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळं बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊन त्यांचा पुरवठा कमालीचा घटला आहे. विदर्भातून रोज 200 ट्रक संत्रा बांगलादेशला जात होता, आता फक्त 20 ट्रक संत्रा बांगलादेशात जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी सांगितली. रोज 180 ट्रक संत्रा भारतातील बाजारपेठेत अतिरिक्त राहत असल्यानं छोट्या आकाराच्या संत्र्याला कोणीही खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळं तोडणीमध्ये निघणारा छोट्या आकाराचा संत्रा शेतकरी आणि व्यापारी रस्त्याच्या काठावर फेकून देत आहेत.
प्रती टनामागे सात हजार ते 12 हजार रुपयापर्यंतचे नुकसान
विदर्भातील संत्र्याला बांगलादेश सरकारचा जोरदार झटका,बांग्लादेशने संत्र्याच्या आयातीवरील आयात शुल्क वाढवल्याने संत्र्यांचे भाव गडगडले आहेत. प्रती टनामागे सात हजार ते 12 हजार रुपयापर्यंतचे नुकसान होत आहे. दोन आठवड्यापूर्वी 25 ते 35 हजार रुपये टन या दराने विकला जाणारी संत्री सध्या 18 ते 23 हजार रुपये टनापर्यंत विकला जात आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेश वैदर्भीय संत्र्याची सर्वात प्रमुख बाजारपेठ बनली आहे. जर बांग्लादेशमधील संत्र्यावरील आयात शुल्काचा प्रश्न केंद्र सरकारने लवकर सोडवला नाही, तर भविष्यात वैदर्भीय संत्र्यावर आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विदर्भात मोठे प्रक्रिया उद्योग निर्माण झाले असते तर...
नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं संत्र्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. विदर्भात संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, सर्व संत्रा खाल्ला जात नाही. त्यामुळं संत्र्यावारील प्रक्रिया उद्योगांसाठी भरपूर वाव असूनही, गेली अनेक वर्ष विदर्भात मोठे प्रक्रिया उद्योग निर्माण झाले नाहीत. जर संत्र्यावर प्रक्रिया करुन त्याचे उत्पादन तयार करणारे उद्योग तयार झाले असते. तर अशा पद्धतीनं चांगला मात्र छोट्या आकाराचा संत्रा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नसती असं व्यापाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: