(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wheat Cultivation : यंदा देशात गव्हाची विक्रमी लागवड, कडधान्यासह तेलबियांच्या पेरणीतही वाढ, वाचा सविस्तर आकडेवारी...
Wheat Cultivation : देशात यावर्षी गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळं अन्नधान्याचं कोणतेही संकट येणार नसल्याचं सरकारनं सांगितलं आहे.
Wheat Cultivation : यावर्षीही देशात अन्नधान्याचे (Grain) मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मोठ्या प्रमाणावर शेती पिकांची (Agriculture Crop) लागवड यावर्षी करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं गव्हाच्या लागवडीच्या (Wheat Cultivation) संदर्भातील आकडेवारीची माहिती दिली आहे. देशात यावर्षी गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळं अन्नधान्याचं कोणतेही संकट येणार नसल्याचं सरकारनं सांगितलं आहे. गव्हाची विक्रमी लागवड ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. कडधान्ये आणि तेलबियांच्या (oilseeds)पेरणीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजूनही काही शेतकरी गव्हाची लागवड करत आहेत.
आत्तापर्यंत देशात 3.32 कोटी हेक्टरवर गव्हाची लागवड
गतवर्षी गव्हाच्या लागवडीची स्थिती फारशी चांगली नव्हती. क्षेत्रफळही कमी होते. त्याचबरोबर उत्पन्नाच्या बाबतीतही गतवर्षी विशेष काही वाढ दिसली नाही. अति उष्णतेचा गव्हाच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. त्यामुळं उत्पादनात घट झाली होती. मात्र, यंदा गव्हाच्या पेरणीची परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. रब्बी पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. देशात सर्वाधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाखालील क्षेत्र गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक आहे. यावर्षी 3.32 कोटी हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली आहे.
उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पादन होण्याची शक्यता
देशात बटाटा आणि गव्हाची पेरणी अजूनही सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बटाट्याची आणि गव्हाची पेरणी सुरू आहे. गेल्या वर्षी गव्हाच्या उत्पादनाचे निश्चित उद्दिष्ट 112 दशलक्ष टन ठेवण्यात आले होते. यंदा निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक गव्हाचे उत्पादन होम्याची शक्यता आहे. खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसामुळं यावेळी हवामानात ओलावा अधिक असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिवाळाही लांबणार आहे. गव्हाच्या पेरणीसाठी हवामान उत्तम राहील. त्यामुळं तज्ज्ञांच्या आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आपल्या शेतात गव्हाची पेरणी करत आहेत.
गेल्या दोन वर्षांत इतक्या क्षेत्रावर गव्हाची पेरणी
गेल्या वर्षांपासून गव्हाच्या पेरणीचा आकडा सातत्याने वाढत आहे. 2020 मध्ये 3 कोटी हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. सन 2021 मध्ये गव्हाच्या पेरणीचा आकडा 3.15 कोटी हेक्टरपर्यंत वाढला आहे. यंदा गव्हाच्या पेरणीचे आकडे झपाट्याने वाढले आहेत. आतापर्यंत 3.32 कोटी हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. आता हे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कडधान्य, तेलबियांच्या लागवडीतही वाढ
केंद्र सरकार कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या पेरणीवरही लक्ष ठेवून आहे. चालू हंगामात 1.58 कोटी हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत 1.56 कोटी हेक्टरवर पेरणी झाली होती. हरभऱ्याचा पेरा गेल्या वर्षीच्या 1.09 कोटी हेक्टरच्या तुलनेत 1.07 कोटी हेक्टर झाला आहे. हरभऱ्याखालील क्षेत्रात यंदा घट झाली आहे. दुसरीकडे तेलबिया पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 97.66 लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली होती. यंदा हा आकडा वाढून 1.05 कोटी हेक्टर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: