(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळीच्या बागा जमिनदोस्त; बळीराजा संकटात
Hingoli : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील अनेक भागातील केळीच्या बागांना फटका बसला आहे.
Hingoli Agriculture News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं (Rain) हजेरी लावली. याचा मोठा फटका केळीच्या बागांना बसला आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमिनदोस्त झाल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे डोंगरकडा भागातही केळीच्या बागांचे नुकसान झालं आहे. डोंगरकडा येथील शेतकरी नितीन गावंडे यांची अडीच एकर केळीची बाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं जमिनदोस्त झाली आहे.
केळीची बाग काही दिवसातच विक्रीसाठी येणार होती
नितीन गावंडे यांची केळीची बाग काही दिवसातच विक्रीसाठी येणार होती. परंतू, त्या पूर्वीच काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका नितीन गावंडे यांना बसला आहे. या केळीची विक्री करुन मिळणाऱ्या पैशातून शेतकरी पुढील पेरणी करणार होता. परंतू त्या अगोदरच नुकसान झाल्याने शेतकरी नितीन गावंडे हे हैराण झाले आहेत.
केळी पिकाचं मोठं नकसान, अद्याप मदत नाही
या आगोदर देखील केळीच्या बागांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर पंचनामे झाले परंतू, त्यानंतर कोणतीही मदत मिळाली नसल्याची माहिती केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता उभे करायचे असेल तर तत्काळ मदत मिळणे आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विविध नैसर्गीक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय
महाराष्ट्रामध्ये केळीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. मात्र, केळीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. वारंवार केळीला हमीभाव देण्याची मागणी होत आहे. मात्र, अद्यापही केळईला हमीभाव मिळाला नाही. शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात केळीची विक्री करावी लागत आहे. याचा मोठा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. अशातच विविध नैसर्गीक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागात आहे. आधीच अवकाळी पावसाचा मोठआ फटका केळीच्या बागांना बसला होता. हाती आलेली केळीच्या बागासंह इतर बागा वाया गेल्या होत्या. त्यातून शेतकरी सावरत असताना आता पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा मोठा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळं आाता हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, केळी उत्पादक संघाचं मुख्यमंत्र्यांना साकडं; मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होणार