Ajit Nawale : शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा, केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीनं समस्या सुटणार नाही : अजित नवले
Ajit Nawale : केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यानं समस्या सुटणार नाही, तर केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात कर रद्द करावा अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केलीय.
![Ajit Nawale : शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा, केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीनं समस्या सुटणार नाही : अजित नवले Agriculture News kisan sabha leader dr ajit nawale comment on central-government will buy onion Ajit Nawale : शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा, केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीनं समस्या सुटणार नाही : अजित नवले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/e0140ccda23f49b7d6eb0915de6af8131692687493007339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ajit Nawale : केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यानं समस्या सुटणार नाही, तर केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात कर रद्द करावा अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Dr Ajit Nawale) यांनी केलीय. महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे. एकीकडे त्या संपूर्ण कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावायचा आणि दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी फार काही करतोय असे दाखवत केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा. हा समस्येवरील उपाय नसल्याचे अजित नवलेंनी म्हटलंय.
केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय?
केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
...त्यानंतर सरकारी कांदा खरेदी सारखे उपाय करावे
आज घडीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रीक टन कांदा शिल्ल्क आहे. व्यापाऱ्यांकडे यापेक्षाही जास्त कांदा शिल्लक असण्याची शक्यता असल्याचे मत अजित नवले यांनी व्यक्त केले.
केवळ दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी केल्यामुळं समस्या सुटणार नाही. निर्यात शुल्क आकारल्यामुळं शेतकऱ्यांचे जे नुकसान होणार हे ते या निर्णयाने भरुन निघणार नाही. भाव स्थिर होमार नाहीत, म्हणून सरकारनं कांदा निर्यातीवर लागू केलेला 40 टक्क्यांचा कर मागे घ्यावा. त्यानंतर सरकारी कांदा खरेदी सारखे उपाय करावे अशी मागणी अजित नवले यांनी केलीय.
दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय हा फसवा, व्यापाऱ्यांची टीका
सरकारने नाफेड मार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर कांदा निर्यात दर व्यापाऱ्यांनी टीका केलीय. केवळ नगर, लासलगाव आणि सोलापूर बाजाराचा विचार केला तर पाच ते सहा लाख टन कांदा दररोज विक्री होतो. त्यामुळं केवळ दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय हा फसवा असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच नाफेडमार्फत खरेदी केला जाणारा कांदा हा उच्च प्रतीचा लागतो. मात्र आज शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला 60 ते 65 टक्के कांदा साधारण दर्जाचा असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. शासनाने 2 हजार 410 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उच्च प्रतीच्या कांद्याला त्याहीपेक्षा जास्त दर आम्ही देत आहोत असे मत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार पेठेतील कांदा निर्यातदार रफिक नदाफ यांनी व्यक्त केले. शासनाने निर्णयच घ्यायचा असेल तर निर्यातशुल्क वाढवलेले कमी करावे, ठराविक बाजार पेठेतून नाफेड कांदा खरेदी करणार मग सोलापूर कृषी उत्पन्न बाजार पेठेतील व्यपारी, शेतकऱ्यांनी काय करावं? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
महत्त्वाच्या बातम्या:
Onion News : केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)