Agriculture News : राज्यात 33 टक्के पेरण्या पूर्ण, अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते-बियाणे खरेदी करावी : कृषी आयुक्त
Agriculture News : सध्या राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात पावसानं दडी मारली आहे.
Agriculture News : सध्या राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात पावसानं दडी मारली आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी (Farmers) शेती कामांना सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर चालू खरीप हंगामात (Kharif Season) अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे आणि खते खरेदी करावीत असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी केलं आहे.
Kharif Season : खरीप हंगामासाठी 46.07 मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध
चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात 16 लाख 82 हजार 245 क्विंटल म्हणजे 87 टक्के बियाणांचा पुरवठा झाला असल्याची माहिती कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहनही सुनील चव्हाण यांनी केले आहे. राज्याचे सरासरी पर्जन्यमान 314.03 मिमी असून आत्तापर्यंत 227.03 मिमी एवढा पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी 46.07 मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहितीही आयुक्त चव्हाण यांनी दिली.
राज्यात 33 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण
चालू खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र हे 142 हेक्टर आहे. आज अखेर 47.13 लाख हेक्टरवर 33 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटिकेची कामे सुरु आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास या आठवड्यात पेरणीच्या कामाला आणखी वेग येणार असल्याचे सुनिल चव्हाण म्हणाले. राज्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असून फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरेदीची पावती आणि टॅग जपून ठेवावेत. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. सध्या राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा
चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: