IPL 2022 : हम तो डूबे हैं सनम...., मुंबई इंडियन्स कुणाची वाट लावणार? या चार संघाना धोका
Mumbai Indians IPL 2022 Matches : मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. पण मुंबई इंडियन्स आपल्या उर्वरित सामन्यात विजय मिळवत प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी वाढवू शकते.
Mumbai Indians IPL 2022 Matches : रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाची यंदाची कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. मुंबईच्या संघाला आद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. सुरुवातीच्या आठही सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. पण मुंबई इंडियन्स आपल्या उर्वरित सामन्यात विजय मिळवत प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी वाढवू शकते. मुंबईमुळे एखाद्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
मुंबई इंडियन्सचे अद्याप सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. पण प्रतिस्पर्धी संघाला याचा फटका बसू शकतो. कारण मुंबईमुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. मुंबईकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे मुंबईच्या संघावर दबाव नसणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघाची वाट लावू शकतात.
मुंबईचे उर्वरित सामने कुणासोबत अन् कधी?
30 एप्रिल - राजस्थान रॉयल्स
6 मे - गुजरात टायटन्स
9 मे - कोलकाता नाईट रायडर्स
12 मे - चेन्नई सुपरकिंग्स
17 मे - सनरायजर्स हैदराबाद
21 मे - दिल्ली कॅपिटल्स
मुंबईचे पुढील सहा सामने असलेल्या संघामध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल चार संघामध्ये आहे. सध्याचा त्यांचा फॉर्म पाहाता त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश नक्की मानला जातोय. कोलकाता संघाला आठ सामन्यात पाच पराभव स्विकारावे लागले आहे. कोलकात्याचे सहा गुण आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी कोलकात्यासाठी प्रत्येक सामना महत्वाचा असणार आहे. एक पराभव कोलकात्याचं स्पर्धेतील आव्हान खडतर करु शकते. दिल्लीच्या संघाचे सात सामने बाकी आहेत. झालेल्या सात सामन्यात दिल्लीचे सहा गुण आहेत. प्रत्येक सामना दिल्लीसाठी महत्वाचा आहे. हैदराबादनेही दमदार पुनरागमन करत सलग पाच विजय मिळवले आहेत. पण यापुढील प्रत्येक सामना त्यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. मुंबईचा सर्वात मोठा फटका चेन्नईला बसू शकतो. चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. चेन्नईने आठ सामन्यात फक्त दोन विजय मिळवले आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईला उर्वरित सहा सामने मोठ्या फरकाने जिंकायचेत. चेन्नईला पुढील एक पराभव प्लेऑफमधून बाहेर काढू शकतो.
मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. पण यापुढील सर्व सामने जिंकून मुंबई शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ सहा संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे...