Pune Wagholi Accident : वाघोलीत 9 जणांना चिरलेल्या डंपर चालकासह मालकाला ठोकल्या बेड्या; दारू पीत असल्याची माहिती असतानाही ठेवलं कामावर अन्...
Pune Wagholi Accident : पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे: पुण्यातील वाघोली केसनंद परिसरामध्ये रविवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. या प्रकरणात डंपर चालकासह मालकाला देखील अटक करण्यात आली आहे.
या अपघात प्रकरणात डंपरवर ठेवलेला चालक दारू पीत असल्याची माहिती असताना देखील त्याला डंपर चालवण्यासाठी दिल्याने वाघोलीतील डंपरच्या मालकाला वाघोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी मध्यरात्री मद्यधुंद डंपरचालकाने नऊ जणांना चिरडले होते. त्यातील तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. अनिल काटे असे अटक केलेल्या डंपरमालकाचे नाव आहे. पोलिसांनी अनिल काटे याला वाघोली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तपासात अनिल काटे या डंपरचालकाला दारू पिण्याचे व्यसन होते, हे माहिती होते. जेव्हा डंपरचालक डंपर घेऊन चालला होता, तेव्हा काटे याला याबाबत माहिती होती. तसेच, चालकाने डंपरमधील माल आव्हाळवाडीत उतरवला होता. तपासात काटे या चालकाने डंपर घेऊन जाताना दारू प्यायली होती का नव्हती, याबद्दल माहिती नसल्याचेही सांगितले आहे. चालक दारू पितो याची माहिती असताना देखील त्याला वाहन चालवण्यासाठी देण्यात आलं होतं.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, एकतर मालकाने मद्यपी डंपरचालकाला गाडी चालवण्यासाठी द्यायला नको होती. तसेच, त्याला नोकरीवर ठेवताना गाडी चालवताना मद्य पिऊन गाडी चालवायची नाही, असे नोकरीवर ठेवण्यापूर्वी सांगणे अपेक्षित होतं. त्यामुळे याप्रकरणी डंपरमालकाला अटक करण्यात आली आहे.
मृत झालेल्यांची नावं
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्यांची नावं
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे
नेमकं काय घडलं?
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपातवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं. यामध्ये तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन हा मुळचा नांदेडचा आहे, अपघातातील मृत कामगार हे मुळचे अमरावतीतील आहे. ही घटना रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी कामगारांवरती सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार आहेत रविवारी रात्री ते अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते.