सुमीत वाघमारे हत्या : पोलिस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेणार | बीड | एबीपी माझा
प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. सुमीत वाघमारे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुमीतचा दोन महिन्यापूर्वी वर्गामैत्रिण भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह झाला होता. सुमीतशी लग्न केल्याचा राग मनात ठेवूनच भाग्यश्रीच्या भावाने आपल्या मित्रांची मदत घेऊन त्याची हत्या केली. इंजिनीअरिंगची परीक्षा देऊन परतत असताना भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी सुमीतवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुमीतचा जागीच मृत्यू झाला, तर भाग्यश्री या हल्ल्यात जखमी झाली आहे.
हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमीतच्या मदतीसाठी भाग्यश्री याचना करत होती. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुमीतच्या नातेवाईकांनी केली आहे. सुमीतवर हल्ला करणारे तिघेही आरोपी घटनेनंतर फरार झाले असून पोलिसाकंडून त्यांचा शोध सुरू आहे. सुमीतच्या कुटुंबाने आतापर्यंत त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नाकारला होता, परंतु आता पोलिस अधिक्षकांनी आश्वासन दिल्यामुळे कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्याचे ठरवले.

















