आधी मटका बुकीवर धाड, पु्न्हा पोलिसांना फोन; मंत्री नितेश राणेंच्या 'रेड'ची जिल्ह्यात चर्चा, सगळ्यांची धावाधाव
पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वत: मटका बुकीवर धाड टाकल्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळवले.

सिंधुदुर्ग: आपल्या आक्रमक आणि हिंदुत्त्वावादी भूमिकेमुळे कायम चर्चेत असलेले भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चक्क आज मटका बुकीवर धाड टाकत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. कणकवली शहरात गेले कित्येक वर्षे मटका बस्तान मांडून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे बुकी आहेत. येथील नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर थेट पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. यावेळी, एका खोलीत काहीजण पैसे आणि चिठ्ठ्यांसह दिसून आले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वत: मटका बुकीवर धाड टाकल्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळवले. त्यामुळे, जिल्ह्यातील पोलिसांची चांगलीच धांदड उडाली असून पोलिसांची कुमक तात्काल घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. येथे धाड टाकल्यानंतर 11 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात येत आहेत. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, नितेश राणे यांनी घेवारी मटका बुकीवर धाड टाकल्यानंतर खोलीत काहीजण बनियनवर, काहीजण पैशांचा हिशोब करताना दिसून आले. त्यामुळे, मंत्री महोदयांनी संबंधितांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन घटनास्थळी बोलवले. त्यामुळे, नितेश राणेंच्या आजच्या रेडची सिंधुर्दुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली असून तसे पत्रही मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. त्यामुळे, गेल्या 2 दिवसांपासून नितेश राणे माध्यमांमध्ये केंद्रस्थानी आहेत. त्यातच, आज स्वत: मटका बुकीवर रेड टाकल्याने अवैध धंदेवाल्यांचेही धाबे दणाणले आहेत.



















