ICC One Day World Cup : आयसीसी वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर सुरुवात
गतविजेता इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यानं आयसीसी वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली. पण या सामन्यासाठी अहमदाबादच्या क्रिकेटरसिकांमध्ये उत्साह असल्याचं अजिबात जाणवलं नाही. एक लाख ३२ हजार क्षमतेच्या या स्टेडियममध्ये सलामीचा सामना सुरु झाला, त्यावेळी प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. विश्वचषकाचा ग्लोबल अॅम्बॅसेडर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत विश्वचषकाचं उद्घाटन करण्यात आलं. या सामन्याची नाणेफेक झाल्यानंतर सचिन विश्वचषक सोबत घेऊन मैदानात उतरला. त्यानंतर दोन्ही संघ मैदानात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन या महारथींची उणीव प्रकर्षानं जाणवली. त्या दोघांनाही दुखापतीच्या कारणास्तव या सामन्यामधून माघार घ्यावी लागली