Lusell Stadium : लुसेल स्टेडियमवर अंतिम फेरीचा थरार, अर्जेंटिना आणि फ्रान्स एकमेकांना भिडणार
फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज रात्री ८.३० वाजता मेस्सीची अर्जेंटिना आणि एमबापेची फ्रान्स एकमेकांना भिडणार आहेत. लुसेल स्टेडियमवर हा अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे. या दोन्ही टीम्सनी याआधी प्रत्येकी दोनदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधलीय. फ्रान्स गतविजेता आहे तर अर्जेंटिनाने स्टार फुटबॉलर मॅरोडानाच्या उपस्थितीत १९८६ मध्ये वर्ल्डकप पटकावला होता. मेस्सीचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे त्याला विनिंग सेंडऑफ देण्याचा अर्जेंटिनाचा प्रयत्न असणार आहे. तर, गतवेळी विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या फ्रान्सला ही किमया पुन्हा साधायचीय, त्यामुळे त्यांची टीमही जिवाचं रान करेल यात शंका नाही. त्यामुळे फुटबॉलप्रेमींना एक थरारक सामन्याची अपेक्षा आहे.























