Sahara Desert : सहारा वाळवंटात होतेय बर्फवृष्टी, पर्यावरण तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
जगातलं सगळ्यात उष्ण ठिकाण म्हणजे सहारा वाळवंट. पण, या वाळवंटात चक्क बर्फवृष्टी होईल, इतकं तापमान घसरलं आहे. यावर पर्यावरण तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे उष्ण आणि कोरड्या प्रदेशात बर्फवृष्टी होणं हे फारसं चांगलं लक्षण नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
जगातल्या सर्वाधिक उष्ण जागांपैकी सर्वात वरचा क्रमांक सहाराचा येतो. आफ्रिकेतील अकरा देशांमध्ये हे वाळवंट पसरलं आहे. याल अल्जेरिया, चाड, इजिप्त, लीबिया, माली, मॉरिटानिया, मोरक्को, नायजर, पश्चिम सहारा, सूदान आणि ट्युनिशिया या देशांमध्ये त्याचा विस्तार आहे. या वाळवंटात तयार होणाऱ्या वाळुच्या टेकड्या 180 मीटर इतक्या असू शकतात. या भागात पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे अशा कोरड्या हवामानात बर्फ पडणं हे आश्चर्यकारक मानल जातं.
सहाराचं सर्वसाधारण तापमान हे 58 अंश सेल्सिअस असतं. पण, सध्या या प्रदेशात तापमान इतकं घसरलं आहे की, इथे बर्फ पडत आहे. हे जागतिक तापमान वाढीमुळे झालं आहे. गेल्या शतकभरात ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक गंभीर दुष्परिणाम झाले आहेत. त्यात सहारा वाळवंट देखील आहे. गेल्या शतकभरात सहारा वाळवंटाचं क्षेत्रफळ 10 टक्क्यांनी विस्तारलं आहे. जर ते असंच वाढत राहिलं तर परिसरातील देशांमध्ये दुष्काळ पडेल.
जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जागतिक तापमानवाढीमुळे अशा उष्ण ठिकाणी थंड वारे वाहणे, तापमान कमालीचे घटणे असे आश्चर्यकारक बदल पाहायला मिळत आहेत. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमअन्वये अशा प्रकारचे बदल रोखण्यासाठी ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन कमी करणं अत्यावश्यक आहे.
सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी 1979, 2016, 2018 आणि 2021मध्येही अशाच प्रकारची बर्फवृष्टी पाहायला मिळत होती.