Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha
Donald Trump Convicted In Hush Money: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना हश मनी (Hush Money) प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. या खटल्यावर सलग दोन दिवस सुनावणी पार पडली, त्यानंतर 12 सदस्यीय ज्युरींनी त्यांना या प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांवर दोषी ठरवलं. अमेरिकेच्या इतिहासात विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध फौजदारी खटला सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांच्यावर 2016 मध्ये राष्ट्रपती निवडणुकांपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्सला मौन बाळगण्यासाठी पैसे दिल्याचं लपवण्यासाठी आणि व्यावसायांती रेकॉर्ड्समध्ये फेरफार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपांमध्ये डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले असून 11 जुलैला डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती जुआन मार्चेन 11 जुलै रोजी त्याची शिक्षा जाहीर करतील. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 15 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी पक्षाकडून पुढच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. त्याचदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टरुमच्या बाहेर बोलताना सांगितलं की, मी काहीच चुकीचं केलेलं नाही. मी निर्दोष आहे. मी लढणार. आपण शेवटपर्यंत लढायचं आणि जिंकायचं. खरा निर्णय पाच नोव्हेंबरला देशातील जनता करेल. सुरुवातीपासूनच हा वादात अडकलेला निर्णय होता. दरम्यान, याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना चार वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण, जेलमध्ये गेल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचार करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मात्र, तुरुंगात गेल्यानंतरही तुरुंगात असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यास त्यांना प्रचारापासून किंवा पदाची शपथ घेण्यापासून रोखलं जाणार नाही.