Jack Ma Missing | अलिबाबा समूहाचे सर्वेसर्वा जॅक मा 2 महिन्यांपासून बेपत्ता
पेइचिंग : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. काही दिवसांपूर्वी जॅक मा यांनी चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यानंतर जॅक मा कुठेही दिसलेले नाहीत. कोरोना काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक बेपत्ता झाल्यामुळे चीनच्या हुकुमशाहीवर पुन्हा एकदा जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
जॅक मा यांनी चीनची बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकांसंदर्भात बोलताना ऑक्टोबरमध्ये शांघाईत दिलेल्या भाषणात टीका केली होती. जगभरातील कोट्यवधी लोकांचा आदर्श असलेले जॅक मा यांनी सरकारला आव्हान दिलं होतं. त्यांनी चीनमधल्या बँकिंग व्यवस्थेवर, व्यापारांवर आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. जॅक मा यांच्या भाषणानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. तेव्हापासून जॅक मा यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात येत होता. तसेच जॅक मा यांनी स्थापन केलेला अलिबाबा समूहावर कारवाई करण्यात आली होती. एवढंच नाहीतर जॅक मा यांच्या इतर उद्योगांवरही कारवाई करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.