Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान
सोलापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सर्वदूर पाऊस आहे. जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस मागील आठवडाभरात झाल्याने बळीराजा आनंदी आहे. खरीप पिकासाठी या पावसाचा फायदा होणार आहे. एकीकडे हा पाऊस आनंद जरी देत असला दुसरीकडे याच पावसाचा फटका देखील अनेक शेतकऱ्यांना बसलाय. मोहोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंब, टरबूज, केळी इत्यादी फळ पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसलाय. मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावातील टरबूज उत्पादक शेतकऱ्याचे या पावसामुळे लाखोचे नुकसान झाले आहे. दादासाहेब भोसले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. भोसले यांनी आपल्या अडीच एकर शेतात 5 लाख खर्चून एक्सपोर्ट दर्जाचे टरबूज पीक घेतले होते. मात्र हे पीक आता जमीनदोस्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे टरबूज पीक हे नुकसान भरपाईच्या निकषात बसत नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा या शेतकऱ्याने केलाय. त्यामुळे हे शेतकरी हवालदिल झाले आहेत.