Solapur ST : सोलापूर विभागात चक्क एसटी नफ्यात , मे महिन्यात 1.41 कोटी नफा : ABP Majha
तोट्यात गेलेली लालपरी अनेक महिन्यानंतर नफ्यात येताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाला मे महिन्यात एक कोटी 41 लाखांचा नफा झालाय. कोविडपासून राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात आहे. मात्र जवळपास तीन वर्षानंतर एसटी पुन्हा एकदा नफ्यात येतेय. सोलापूर विभागाचा विचार करता दर महिन्याला साधारण 42 ते 43 कोटी रुपयांचा खर्च होतो. उत्पन्न मात्र कमी असल्याने साधारणता दर महिना एक ते दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागायचा. मात्र मे महिन्यामध्ये खर्च वजा जाता एसटीला एक कोटी 41 लाख रुपयांचा नफा झाला आहे. मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. शासनाने महिला सन्मान योजना सुरू केल्याने ज्या मार्गांवर प्रवासी नव्हते त्या मार्गावर देखील आता प्रवासी संख्या वाढत आहे. याचा फायदा एसटीला होत असल्याचे सांगितलं जातंय.