Sunil Tingre : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नाव असणारे सुनील टिंगरे देवदर्शनाला? ABP Majha
पुणे : बड्या बापाच्या लेकाला वाचवण्यासाठी पोलिसांपासून ते शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्याचं आता पोलिस (Police) तपासातून समोर आलंय. मात्र, पोलिसांवर दबाव टाकून राजकीय नेतेमंडळीही याप्रकरणात हस्तक्षेप करत होते. त्यातच, अपघाताच्या दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे, राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर अग्रवाल पिता-पुत्रांकडून कायद्याची ऐशीतैशी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माध्यमव समाज माध्यमांच्या दबावानंतर आता पोलीस तपास वेगाने सुरू आहे. त्यातच, पोलिसांनी ब्लड सॅम्पलप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. तर, आमदार सुनील टिंगरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाहीत.
पुणे अपघात प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होत असून एकापाठोपाठ एक अशी अनेक नावे आरोपी म्हणून समोर येत आहेत. पुणे पोलिसांच्या तपास कार्याला गती मिळाली असून याप्रकरणी ससूण रुग्णालयातील 2 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, पुणे अपघात प्रकरणात अनेकांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याने बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, अजय तावरेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 2023 मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर, आमदार सुनील टिंगरे यांना फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फोन उचलत नाहीत.