Pune Car Accident Case : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे दोन डॉक्टर निलंबित
Pune Car Accident Case : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे दोन डॉक्टर निलंबित
पुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला कशी लागली आहे, याचा आणखी एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र, आता हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Road Accident)