(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MNS on Vidhan Sabha | विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार! मनसेने कंबर कसली ABP Majha
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अॅक्शन मोडवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची तयारीत आहे. राज्यातील सर्वच विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन सव्वा 200 पर्यंत जागा लढण्याचा विचार मनसेचा आहे. या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचा दौरा देखील करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या तयारीला वेग आला आहे राज्यात सध्या उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी दिली आहे.
राज्यात सव्वा 200 जागा लढण्याचा आमचा विचार- वैभव खेडेकर
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला आहे. आम्ही विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. सोबतच आमच्यातले अनेक चेहरे हे विधानसभा निवडणूक लढवतील. महाराष्ट्रात मनसेला आशादायी चित्र आहे, हे एकंदरीत आढावा घेतल्यानंतर समजतंय. परिणामी, 288 जागांचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातील सव्वा 200 जागा लढण्याचा विचार आमचा असल्याची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी दिली आहे. येत्या 25 तारखेला राज्यातील सर्व पदाधिकारी यांचा मेळावा मुंबईत होणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या दरम्यान राज साहेबांचा राज्यात दौरा होईल, असेही ते यावेळी म्हणाले.