Mira Bhayandar Morcha Pratap Sarnaik Bottle Thrown : मीरा भाईंदरच्या मोर्चात सरनाईकांवर बाटली फेकली
Mira Bhayandar Morcha Pratap Sarnaik Bottle Thrown : मीरा भाईंदरच्या मोर्चात सरनाईकांवर बाटली फेकली
ठाणे : मीरा भाईंदरमध्ये (Mira bhayandar)मराठी एकीकरण समितीने मोर्चाची (March) हाक दिल्यानंतर मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाने या मोर्चास पाठिंबा देत आज सहभागही घेतला. त्यामुळे, या मोर्चाला विराट स्वरुप प्राप्त झाले आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मारहाणाच्या विरोधात मोर्चा काढला होता, या मोर्चानंतर आता मराठी अस्मिता आणि मराठीच्या मुद्द्यावरुन मीरा भाईंदरमध्ये मराठीजन एकत्र आले असून मनसे आणि शिवसेना नेत्यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिल्याने मोठा पोलीस बंदोबस्त मोर्चाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे अविनाश जाधव यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्धही केले होते. त्यातच, शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) हे या मोर्चात सहभागी झाल्यानंतर मोर्चेकरांनी प्रताप सरनाईक यांना विरोध दर्शवला.
माजीवाडाचे (मीरा-भाईंदरचे) लोकप्रतिनिधी आणि मंत्री प्रताप सरनाईक हेही मी आधी मराठी नंतर मंत्री असे म्हणत मोर्चात सहभागी झाले होते. मी मराठी लिहिलेली गांधी टोपी परिधान करुन ते मोर्चात आले. मात्र, प्रताप सरनाईक यांना पाहताच मोर्चेकरांनी जय गुजरात आणि 50 खोके एकदम ओक्के.. अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, प्रताप सरनाईक यांचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मी जेव्हा मीरा भाईंदरच्या हद्दीत प्रवेश करतो, तेव्हा माझ्या तोंडून हिंदीच निघते, असे सरनाईक यांनी त्या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते. त्यामुळे, मराठी एकीकरणासाठी निघालेल्या या मोर्चातील आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या सहभागाला थेट विरोध दर्शवला. त्यानंतर, प्रताप सरनाईक माघारी फिरले असून अधिवेशनासाठी मुंबईला गेले. विशेष म्हणजे मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रताप सरनाईक हे मुंबईतील पावसाळी अधिवेशनातून मीरा भाईंदरमध्ये आले होते.




















