Ajit Pawar On Modi Govt Oath Ceremony : 10 जूनला मोदी सरकारचा शपथविधी, अजितदादांचे संकेत
लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडल्यानंतर भाजपला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे येत्या 10 जून रोजी दिल्लीत नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या शपथविधीचा पार पडू शकतो. त्यादृष्टीने भाजपच्या (BJP) वर्तुळात वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली आहे. ही कुजबूज सुरु असतानाच अजित पवार यांनी सोमवारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपने मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी (Narendra Modi Oathtaking Ceremoney) 10 जूनला आयोजित करण्याचे ठरवले आहे, या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. अजितदादांनी (Ajit Pawar) येत्या 10 तारखेला दिल्लीत महत्त्वाची घडामोड घडू शकते, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. ही महत्त्वाची घडामोड म्हणजे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी असल्याचे सांगितले जात आहे.
देशभरात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापैकी सहा टप्प्यांची मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या परीने किती जागा मिळणार, याचे अंदाज काढायला सुरुवात केली आहे. भाजपच्या गोटातही अंतर्गत सर्व्हे सुरु असून त्याआधारे आपण 300 जागांचा आकडा पार करु, याची चाहुल पक्षातील वरिष्ठांना लागली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपण सहा टप्प्यांमध्येच 300 जागांचा टप्पा पार केलाय, असे वक्तव्य केले होते. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही भाजप 370 जागांचा आकडा ओलांडेल, असे म्हटले आहे. त्यामुळे भाजपला देशात पुन्हा आपली सत्ता येणार असा आत्मविश्वास असून त्यादृष्टीने 10 जूनला नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे.