(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट', नाशिक पोलिस आयुक्तांकडून सावधगिरीच्या सूचना
नाशिक : हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान भारतात एजंट शोधत असल्याची धक्कादायक माहिती सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघडकीस आली आहे. मागील आठवड्यात नाशिकमध्ये देवळाली कॅम्प आणि हिंदुस्थान एरोनॅटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलमध्ये हेरगिरी केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हनी ट्रॅप आणि इतर मार्गांचा अवलंब
काही असंतुष्ट आणि सरळ साध्या लोकांनाही पाकिस्तान आपल्या जाळयात ओढत असल्याचं तपासात समोर येत आहे. भारतातील सावज टिपताना हनी ट्रॅप आणि इतर मार्गांचा अवलंब केला जात आहे. एच ए एल मधील कर्मचारी दीपक शिरसाट हा दोन वर्षांपूर्वी हनी ट्रॅपचा शिकार झाला होता. तेव्हापासून तो लढाऊ विमान बांधणी, आणि इतर संवेदनशील प्रकल्पाची माहिती आयएसआयच्या एजंटकडे पोहोचवीत होता. या काळात त्याने बरीच महत्वपूर्ण माहिती पाकिस्तानपर्यंत पोचविली आहे. तर दुसरीकडे देवळाली कॅम्प येथील तोफखाना केंद्रात एका बांधकामच्या साईटवर कंत्राटी काम करणारा संजीव कुमार सहा महिन्यापूर्वी पाकिस्तान एजन्सीच्या जाळयात अडकला होता. सुरुवातीला त्याच्याशी भांडण करण्याचा बनाव रचला आणि नंतर मैत्री वाढवून माहिती घायला सुरवात केली. त्यानेही तोफखाना केंद्राचे फोटो पाकिस्तान मध्ये पाठवले, पण लष्करी जवानांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानी मनसुबे उधळले गेलेत.
नाशिक पोलिस आयुक्तांकडून सावधगिरीच्या सूचना
या दोन्ही घटनांच्या तपासावरून भारतात हेरगिरी करण्यासाठी एजंट शोधत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, इतर देशातील नागरिकांशी संवाद साधताना सावधानता बाळगावी. इतर देशातील अनोळखी नागरिकांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे. त्याच बरोबर शहरातील देशाच्या सुरक्षेशी संदर्भात असणाऱ्या आस्थापनांच्या परिसरात स्मार्टफोन वापरण्यास बंदी घालावी, असे पत्र नाशिक पोलिसांनी आस्थापनांना दिल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे यांनी दिली आहे.