(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Oxygen Shortage : ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 रुग्णांचा मृत्यू? चौकशी होणार, मंत्री आव्हाडांची माहिती
ठाणे : ठाण्यातील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील खाजगी वेदांत रुग्णालयातील हा प्रकार मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी उघडकीस आणला. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली असून ते या घटनेची माहिती घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी सहा सदस्यीय समितीकडून केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एवढंच नाहीतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीही सकाळी वेदांता रुग्णालयाला भेट दिली. तसेच या घटनेची शल्यचिकित्सकांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान वेदांता रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक, मनसे आणि भाजपचे पदाधिकारी जमलेले असून पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज सकाळी ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हॉस्पिटल प्रशासन आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात जमण्यास सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ऑक्सिजनअभावी झाला की, अन्य कोणत्या कारणामुळे याबाबत अद्यापही रुग्णालय प्रशासनानं कोणतीही माहिती दिलेली नाही.