Air Pollution in Navi Mumbai | नवी मुंबई, पनवेलमधील वायू प्रदूषण तिपटीने वाढलं
तुम्ही जर खारघर-तळोजा-पनवेल पट्ट्यातील रहिवासी असाल तर तुमचे मॉर्निंग वॉक तुम्हाला फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान करणारे ठरु शकते. कारण हवेतील प्रदूषण पातळी प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने याचा परिणाम तुमच्या शरीरावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वातावरण फाऊंडेशन या पर्यावरण संस्थेने गेल्या महिनाभर केलेल्या हवेच्या गुणवत्तेत प्रदूषण पातळी चक्क 60 पीएमवरुन 200 पीएमवर पोहोचली आहे. हवेतील प्रदूषण तिप्पटीने वाढल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
नवी मुंबई , पनवेल भागात गेल्या काही वर्षात हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे अनेक अहवालांमध्ये समोर आलं आहे. तळोजा एमआयडीसीमधील कंपन्यांमधून हवेत सोडले जाणारे विषारी गॅस, सुरु असलेलं नवीन बांधकाम, हायवेवरुन जाणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर आदी करणांमुळे प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर जाऊन पोहोचली आहे.
पर्यावरणावर काम करणाऱ्या वातावरण फाऊंडेशनने एक महिनाभर हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एअर क्वॉलिटी मॉनिटर मशीन बसवल्या होत्या. 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. पनवेल, तळोजा एमआयडीसी, नावडे, खारघर सेक्टर 36, खारघर सेक्टर 7 या पाच ठिकाणी बसवलेल्या या मशीनमध्ये हवेची गुणवत्ता रोज तपासली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग महिनाभर तपासलेल्या हवेच्या गुणवत्तेत चक्क 200 पीएमपर्यंत प्रदूषणाची पातळी नोंदवली गेली आहे.