Mumbai Rain Update | मुंबईसह उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस; सखल भागात पाणी साचलं
मुंबई शहरासह उपनरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळपासूनच बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. तसेच येत्या 24 तासांतही मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर वरळीच्या बीएमसी क्वॉर्टसमध्ये पाणी शिरलं.
मुंबईमध्ये काल सध्याकाळपासून मु`सळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. मुंबई मधील परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी, मालाड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनाही नदीचं रूप आलं आहे. अंधेरी येथील सब वेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे भरलेल्या पाण्यात काही रिक्षा वाहून आल्या तर बेस्टची बस देखील अडकून पडली होती.