(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kanjurmarg Metro Car Shed | आम्ही घेतलेला निर्णय केंद्राच्या जिव्हारी लागला : अजित पवार
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. या निर्णयानंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. कांजूरमार्ग मेट्रोशेडबाबतच्या कोर्टाच्या निर्णयाची बातमी ऐकली. त्यांना (विरोधकांना) जे करायचं ते त्यांनी केलं. आता कायद्याच्या माध्यमातून काय सकारात्मक भूमिका घेता येईल याबाबत सरकार भूमिका घेईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले की, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत सर्व अधिकारी तसेच संबंधितांशी चर्चा करुन मुख्यमंत्र्यांसह एकत्र बसून पुढील भूमिका ठरवली जाईल. काम सुरु करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जातील. कामं सुरु करण्यासाठी कुणी आडकाठी करु नये. विकासकामात आम्ही कधीच राजकारण करत नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय केंद्र सरकारच्या फारच जिव्हारी लागलाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. आम्ही घेतलेला निर्णय काही लोकांच्या जिव्हारी लागला. म्हणून केंद्र सरकारने असा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे.