(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Eknath Shinde and BJP clash: एकनाथ शिंदे हे दरेगावात गेले आहेत. ते सध्या कोणाच्याही संपर्कात नाहीत. ते एखादा मोठा राजकीय निर्णय घेतला जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर महायुती विनासायास सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला होईल, असे सांगितले जात असले तरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी आणि मौन पाहता 5 डिसेंबरला तरी महायुतीचा शपथविधी (Mahayuti Oath Taking Ceremony) पार पडेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या सगळ्यामुळे महायुती विशेषत: भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर निवडक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर ते दरे गावाकडे रवाना झाले. याबाबात बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक सूचक वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्यासमोर राजकीय पेचप्रसंग येतो तेव्हा, त्यांना जेव्हा वाटलं की आपल्याला विचार करायला वेळ हवा आहे, तेव्हा ते आपल्या गावी जातात. दरे गावात त्यांचा मोबाईल लागत नाही. तिकडे ते आरामात निर्णय घेतात. जेव्हा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ते नेहमी दरे गावात जातात. आता ते गावी गेले आहेत, कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत ते एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात. राज्यात जी राजकीय उलथापालथ सुरु आहे, त्याबाबत ते निर्णय घेतील, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: Shiv Sena leader Sanjay Shirsat says, "Whenever Eknath Shinde thinks that he needs some time to think he goes to his native village...When he (Eknath Shinde) has to make a big decision he goes to his native village. By tomorrow… pic.twitter.com/cEb5akzWrM
— ANI (@ANI) November 29, 2024
दिल्लीत गुरुवारी रात्री केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवसास्थानी एक बैठक पार पडली होती. या बैठकीला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती. या बैठकीत झालेल्या फोटोसेशनमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडलेला दिसत होता. महायुतीचे नेते दिल्लीवरुन परतल्यानंतर गुरुवारी मुंबईत खातेवाटपासंदर्भात बैठक पार पडणार होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी लावून धरल्याने चर्चेचे घोडे पुढे सरकले नव्हते. त्यामुळे महायुतीची गुरुवारची नियोजित बैठक रद्द झाली होती. तर एकनाथ शिंदे हेदेखील अचानक वर्षा बंगल्यावरुन बॅगा भरून साताऱ्यातील आपल्या दरे या मूळगावी रवाना झाले होते. एकनाथ शिंदे हे नाराज असल्यामुळे दरे गावात निघून आल्याची चर्चा आहे. एरवी याठिकाणी आल्यानंतर एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. परंतु, शुक्रवारी दरे गावात आल्यानंतर एकनाथ शिंदे हे कोणाशीही न बोलता घरी निघून गेले. एकनाथ शिंदे आज दिवसभरात गावच्या जननी माता मंदिर आणि उत्तेश्वर मंदिराचे दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आणखी वाचा