कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांमध्ये वाढ; स्टेशन परिसरात नागरिकांची गर्दी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरात तब्बल चौदा हजार रुग्णांची भर पडली आहे. गेल्या आठवडाभरात दर दिवसाला रुग्ण संख्येचा उच्चांक गाठला जात असून काल एका दिवसात तब्बल 1244 रुग्ण कल्याण-डोंबिवली शहरात आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने शहरात दुकानदार फेरीवाल्यांवर निर्बंध लागू केले आहेत. दुकानदारांसाठी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्यात. तर शनिवार-रविवार फेरीवाल्यांना स्टेशन परिसरात बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं जातंय.
मात्र काल (रविवारी) स्टेशन परिसरात व्यापाऱ्यांसह नागरिकांचा बेजबाबदारपण समोर आला नागरिकांनी खेरेदीसाठी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. फेरीवाल्यांवर बंदी असताना देखील फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करताना दिसत होते. तर दुकानामध्ये देखील गर्दी दिसून आली. महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच पुन्हा हे फेरीवाले रस्त्यावर दिसून येत होते. केडीएमसीकडून सातत्याने नागरिकांना कोरोनाच्या त्रिसूत्रीच पालन करण्याचे आवाहन केल जातंय. महापालिकेचं आरोग्य विभाग कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे मात्र व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.