Borivali Building Collapsed : बोरिवलीत 4 मजली इमारत कोसळली; बचावकार्य सुरु
Mumbai Building Collapsed : मुंबई-बोरीवलीत 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बोरीवलीतल्या साईबाबा नगरमधील गितांजली ही इमारत दुर्घटना घडली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी इमारत कोसळल्याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाला लेव्हल 2 चा कॉल मिळाला होता. बोरिवलीतील साईबाबा नगरमधील गितांजली नावाची ही इमारत आहे. तळमजला आणि तीन मजले अशी ही इमारत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारत जखमी झाल्याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोसळलेली गितांजली इमारत पालिकेकडून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. पालिकेकडून इमारतीतील सर्वांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यापैकी एक पंजाबी कुटुंब इमारत कोसळली तेव्हा इमारतीत उपस्थित होतं. याच कुटुंबातील 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
इमारत कोसळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पत्त्यासारखी ही इमारत अगदी क्षणार्धात जमिनदोस्त झाली. सध्या बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली एका कुटुंबातील 5 ते 6 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. त्यासोबतच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.