(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anjali Damania on Bhujbal : निकालाला हायकोर्टात आव्हान देणार! सरकारी वकील गैरहजर का होते? अंजली दमानियांचा सवाल
मुंबई : महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. आज मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या खोटे नाटे आरोप झाले. आमच्यावर मीडिया ट्रायल झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावं लागलं. या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितलं. आज आम्हाला त्या केसमधून निर्दोष मुक्त केलं आहे, असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे. छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना सेशन कोर्टाकडून महाराष्ट्र सदन केसमधून मुक्तता केली आहे. मी या निर्णयाला हायकोर्टात चॅलेंज करणार आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे. भुजबळ, समीर भुजबळ आणि इतरांनी तळोजाच्या एका केसमध्ये दाखल केलेले डिस्चार्ज पीटीशन कोर्टाने मान्य केले. पण सरकारी वकील गैरहजर होते? का? मग केसची बाजू कोण मांडणार? सगळ्या केसेस अशा एक एक डिस्चार्ज मिळत जाणार? सरकार आपली बाजू न मांडता? असा सवाल दमानिया यांनी केला आहे.