Sushma Andhare on Raj - Uddhav : उद्धव ठाकरे म्हणालेत, मनसेसोबतच्या युतीला माझ्याकडून अडचण नाही
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) यांच्यातील युती संदर्भातल्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येणार का? हा प्रश्न राजकीय चर्चेत आहे. त्यातच, आदित्य ठाकरे यांनी मागील 2 आठवड्याभरापासून मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून युतीला हिरवा कंदील पण दुसरीकडे मनसेकडून युती संदर्भात बोलायला मौन बाळगल्याचा पाहायला मिळालं. खरंच दोन महिन्यापासून माध्यमांमध्ये होणाऱ्या या चर्चा आणि प्रतिक्रिया पुढे जाणार आहेत का? नेमकं या दोन पक्षात काय सुरू आहे? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, गेल्या काही दिवसांत मनोमिलनाच्या होणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्ष सोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत आम्ही साद दिली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आणि पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मनसे सोबत युती करण्याची तयारी दर्शवली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक महत्त्वाचे नेत्यांनी आपण मनसेसोबत युती करण्यास पूर्णपणे सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं. युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा युती संदर्भात पुढे पाऊल टाकण्यास तयार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मात्र, मनसेकडून अद्यापही याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही. युतीच्या चर्चेला राज ठाकरेंच्या मुलाखतीतून सुरुवात झाली त्याचा अर्थ प्रत्येकाने वेगळा घेतला असल्याचं राज ठाकरेंनी मुलाखतीतच स्पष्ट केलं आहे.






















