Shiv Sena vs BJP : पुन्हा पेपरात, सारसारव जोरात? ; कालची जाहिरात चुकून की ठरवून?
काल शिवसेनेच्या जुन्या जाहिरातीवरुन वादाचं वादळ उठवल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं नवी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये जारी केली.... आणि या नव्या जाहिरातीतून सारवासारव करण्यात आली का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काल सकाळी सर्व वर्तमानपत्रात जाहिरात आली. सकाळी दहाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या नेत्यांना ही आम्ही प्रकाशित केलेली नाही असं सुचवलं गेलं. प्रत्यक्षात लगोलग खुलासा न येता दीड वाजता शिंदे शिवसेनेकडून पहिला खुलासा आला. शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन ही जाहिरात आमची नसल्याचे सांगितलं. पण त्यातही तो हितचिंतक कोण हे शंभूराज देसाई यांनी सांगितलं नाही. जर या जाहिरातीमुळे भाजपा शिवसेनेच्या संबंधात मिठाचा खडा पडला होता तर अशी चुकीची जाहिरात दिल्याची कुठली कारवाई केला तेही सांगितलं नाही. त्या जाहिरातीत प्रकाशकाचे नाव जाणिवपुर्वक छापले गेले नव्हते का, असाही सवाल उपस्थित होतो. संध्याकाळच्या कोल्हापूरच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक केलं आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना ही आमची जाहिरात नसल्याचे सांगितलं. आणि मग दुसऱ्या दिवशी नवी जाहिरात प्रकाशित केली. या सगळ्याचा अर्थ असा होतो की जी चर्चा शिंदे सेनेला अपेक्षित होती ती होऊ दिली त्यानंतर पहिला खुलासा आला आणि मग आज नवीन जाहिरात आली.