(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
गणपत देशमुखांना संपूर्ण राज्यभरात आबा नावाने त्यांना हाक मारली जात होती. गणपतराव देशमुखांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 साली सोलापूर येथे झाला. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्षात होते. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता. 2019 ला राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली.