(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Full PC on SC Verdict : शरद पवार म्हणाले, सु्प्रीम कोर्टाने सत्ताधाऱ्यांविरोधात...
Maharashtra Politics Sharad Pawar: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निकाल देताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. उद्धव यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा सरकार आणलं असतं, अशी टिप्पणी केली. या टिप्पणीवर आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव यांच्या राजीनाम्याबाबत आता चर्चेला काहीच अर्थ नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी छोटेखानी पत्रकार परिषदेला संबोधित केले. पवार यांनी म्हटले की, काही निर्णय अजून व्हायचे आहेत, असं मला वाटतं. राज्यकर्त्यांविरोधात सुप्रीम कोर्टाने तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. राज्यपालांची भूमिका चुकीची होती. हे कोर्टाने नमूद केले आहे. घटनात्मक संस्थांनी आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडायची असते. राज्यपालांची भुमिका चुकीची राहीली होती याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता तत्कालीन राज्यपाल राज्यात नाहीत, त्यामुळे फार चर्चेला अर्थ नाही, असेही पवार यांनी म्हटले.