Salman Khan House Firing : लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं ओला कार बूक, आरोपीला अटक
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं अभिनेता सलमान खानच्या पाठी लागलेला दहशतीचा सिलसिला काही थांबायचं नाव घेत नाहीय. सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट या इमारतीच्या दिशेनं रविवारी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोन आरोपींना गुजरातच्या भुजमधून अटक केली आहे. त्यानंतर परवा सकाळी लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं एक ओला कार बुक करून ती गॅलक्सी अपार्टमेंटच्या पत्त्यावर पाठवण्यात आली होती. त्या ओला कारचालकानं आपली गाडी गॅलक्सी अपार्टमेंटजवळ गाडी थांबवली आणि लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं कार बुक आहे. त्यांना पाठवा असा हेका सुरक्षारक्षकांकडे धरला. ती ओला कार लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं गॅलक्सी अपार्टमेंटपासून वांद्रे पोलीस स्थानकासाठी आरक्षित करण्यात आली होती. या प्रकरणात सलमान खानच्या सुरक्षारक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी ओला कारचालकाकडून माहिती घेतली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी ओला कार बुक करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशमधल्या गाजियाबादमधून अटक केली. त्या आरोपीचं नाव रोहित त्यागी असून, तो अवघ्या वीस वर्षांचा आहे. या प्रकरणात रोहित त्यागीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.