Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांचं आघाडीकडून जोरदार समर्थन, शिवसेनेचा मात्र एकच मंत्री उपस्थित
ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या मंत्री नवाब मलिक यांचं आज महाविकास आघाडीनं जोरदार समर्थन केलं. त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदार आणि मंत्र्यांनी आज मंत्रालयासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलं आणि नवाब मलिक यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसचे मंत्री आणि नेते सकाळीच या आंदोलनासाठी पोहोचले, पण सुरुवातीला तासभर शिवसेनेचे मंत्री आंदोलनस्थळी दिसले नाहीत, त्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमदार यामिनी जाधव या दोघांचीच उपस्थिती सुरुवातीला होती. पण त्यानंतर शिवसेनेचे काही आमदार पोहोचले. उद्योगमंत्री सुभाष देसाई पोहोचल्यानं ही चर्चा थांबली. आंदोलनाचा निर्णय रात्री उशिरा झाल्यानं मतदारसंघात किंवा दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते आले नाहीत, असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला सुभाष देसाई हे एकमेव मंत्री शिवसेनेकडून उपस्थित होते. उपस्थित आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी मग जोरदार घोषणाबाजी करत मलिक यांच्यावरील कारवाईचा निषेध केला आणि त्यांना पाठिंबा दर्शवला.