(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्य
Narendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्य
पुणे: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुरुवारी पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट (Pune Metro) या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सभा होणार आहे. मात्र, कालपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नरेंद्र मोदी यांच्या या सभेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
पुण्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात (S P College Ground) मोठ्याप्रमाणावर चिखल झाला आहे. सततच्या पावसामुळे सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात सर्वत्र ओले झाले आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे. त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कालपासूनच पंतप्रधान मोदींची सभा पार पडू शकणार की नाही, याबाबत साशंकता होती. पुण्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुण्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता आहे. पावसाचा रागरंग पाहून कालपासूनच आयोजकांनी चाचपणी सुरु केली होती. आज संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर पुन्हा पाणी साचून चिखल होणार, हे अटळ आहे. तसे घडल्यास पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) या सभागृहात पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडू शकते. या सभागृहाची आसनक्षमता जास्त आहे. त्यामुळे वेळ पडल्यास याठिकाणी सभा घेतली जाईल. पाऊस आणि हवामान तपासल्यानंतरच आयोजकांकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. तुर्तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एस पी कॉलेजच्या मैदानावर पार पडावी यासाठी मेहनत घेतली जात आहे. मात्र, आता पाऊस काय करणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारी पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.