Manohar Chandrikapure Gondia : अजित पवारांनी माझा केसाने गळा कापला - मनोहर चंद्रिकापुरे
Manohar Chandrikapure Gondia : अजित पवारांनी माझा केसाने गळा कापला - मनोहर चंद्रिकापुरे
गोंदियातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना डावलून, भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मनोहर चंद्रिकापुरे यांनी बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीत प्रवेश करत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला असा आरोप आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला. मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, माझ्या मुलाला मी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे आणि त्याच्या पाठीशी उभा असेल.. अजित दादांनी मला अंधारात ठेवून माझा केसाने गळा कापला... जर दादांनी मला म्हटलं असतं चंद्रिकापुरे तुमचा परफॉर्मन्स बरोबर नाही. बडोले तुमच्यापेक्षा समोर आहेत तर मीच तिकिट देऊ नका असं म्हटलं असतं. माझ्या पाठीत खंजीर खुपसल्याचा जयंत पाटील यांना देखील खूप दुःख झालं. पण वाटाघाटी झाल्यामुळे आम्ही काहीच करू शकणार नाही असे ते म्हणाले. आशीर्वाद देणारे खंजीर खुपसणार तर वेदना असह्य : मनोहर चंद्रिकापुरे आशीर्वाद देणारे हात जर पाठीत खंजीर खुपसणार असतील तर त्या वेदना असह्य होतात. प्रफुल पटेल साहेब जर तुम्हाला आम्हाला मारायचेच होतं तर पाणी प्यायला थोडी उसंत द्यायला पाहिजे होती. किती क्रूरपणे निर्णय घेतला आणि एका निष्पाप माणसाच्या बळी घेतला याचा बदला जनता घेईल. फितूर आणि विश्वासघाती लोकांना या मतदारसंघातील नागरिक धडा शिकवतील, असे मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले. मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता निवडणुकीच्या अगदी तोंडावर बच्चू कडू यांनी 'परिवर्तन महाशक्ती' नावाने तिसरी आघाडी तयार केली होती. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांनी पक्षप्रवेश देत उमेदवारी ही जाहीर केली होती... त्यामुळे नाराज असलेले मनोहर चंद्रिकापुरे व सूगत चंद्रिकापुरे यांनी अखेर बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.