Maharashtra Unlock : टप्प्याटप्यानं दिलासा मिळणार, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत मंथन
मुंबई : सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडली. सध्या राज्यांत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशातच लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभाही देण्यात आली आहे. अशातच धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. तसेच, हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले होतं. काल (सोमवारी) पार पडलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली असून यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून राज्यातील अनेक भागांत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुंबईतही अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुंबई लोकलबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलताना मोठी घोषणा केली. मुंबई लोकल कधी सुरु होणार, याबाबत मुंबईकरांकडून प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले जात होते. अशातच 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
देशासह राज्याच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. या अनुषंगानं राज्यात अनेक उपाय-योजनाही केल्या जात आहे. तसेच निर्बंध शिथील करतानाही तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेतली जात आहे. यासंदर्भातही टास्क फोर्सच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा पार पडली. तिसऱ्या लाटेची शक्यता आणि सध्याची कोरोनाबाधितांची संख्या या सर्वांचा सारासार विचार करुनच राज्यातील धार्मिक स्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी बोलताना सांगितल्यानुसार, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.