Uday Samant PC : सरकार राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्याच्या मनस्थितीत, उदय सामंत यांची माहिती
राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. या नैसर्गिक आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देवू न शकल्याचे विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यामुळे, अतिवृष्टी, डेंगू, मलेरीया, टायफाईड इ. साथीचे आजार, ट्राफिक, रोड दुर्घटना इ. मुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचण, एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे, परीक्षेचे पहिले सत्र 30 मिनिटाच्या आत तांत्रिक अडचण निर्माण होणे, परीक्षेला प्रत्यक्ष हजर असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पुर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत.