(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid19 vaccination | राज्यात लसीकरणाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी; राजेश टोपेंनी सांगितल्या दोन अडचणी
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत जनतेला आधार दिला होता. किंबहुना या आव्हानात्मक काळात ते स्वत:सुद्धा जबाबदारीनं पुढाकार घेत राज्याला कोरोनामुक्तीच्या दिशेनं नेताना दिसले. यातच आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला, तो म्हणजे कोरोना लसीकरणाचा. देशासह राज्यातही काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणास (Coronavirus Vaccination) सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील या लसीकरणाचा उत्साह सुरुवातीला दिसून आला. पण, आता मात्र राज्यात, कुठंतरी लस घेण्यासाठी येणाऱ्यांचा आकडा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देत राजेश टोपे यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं.
कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज, असल्याचं म्हणत टप्प्याटप्प्यानं पार पडणाऱ्या या प्रक्रियेत योग्य वेळी मी स्वत:सुद्धा लस घेणार असल्याचं आश्वासक वक्तव्य त्यांनी केलं. राज्यात लसीकरणाचा आकडा कमी झालेला असतानाच मुळात हेच कारण नसून लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपमध्येही काही तांत्रिक अडचणी येत आहेत ही बाब त्यांनी मांडली. या अडचणी दूर होऊन सुधारणा होत असल्याची बाबही त्यांनी मांडली.
लस स्वत:हून जाऊन घेण्यास पूर्णपणे प्रतिसाद मिळेल असं नाही, ही वस्तूस्थिती मांडत कोणी दुसऱ्यानं आधील लस घेतल्यानंतर आपण घेऊ अशीच अनेकांची मानसिकता असल्याचं चित्र त्यांनी सर्वांपुढं ठेवलं. यावर तोडगा म्हणून राजेश टोपे स्वत: पुढाकार घेत एका व्हिडीओच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणात सहभागी होण्याचा संदेश देणार आहेत.